दौंड : दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी जीर्ण व धोकादायक झाडे काढण्यासाठी काढण्यात येणारी निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी दौंड शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या श्वास पर्यावरण संस्थेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
धोकादायक झाडे काढण्याच्या नावाखाली सरसकट वृक्षतोडीला प्रोत्साहन देणारी ही निविदा पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरत आहे अशी भूमिका संस्थेने मांडली आहे.
विशेष म्हणजे, झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराला आर्थिक मोबदला देण्याची व्यवस्था नेमकी कोणत्या पर्यावरणपूरक धोरणाला अनुसरून आहे? झाडांचे संरक्षण करण्याऐवजी झाडे तोडण्यासाठीच शासनाकडून आर्थिक तरतूद केली जात आहे का? असा सवालही श्वास संस्थेने उपस्थित केला आहे.
खरोखरच धोकादायक असलेल्या झाडांची तज्ज्ञांकडून तपासणी करून आवश्यक तीच कारवाई करावी. मात्र, निविदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता निर्माण करणारी ही पद्धत तत्काळ बंद करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
वृक्षसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेने वृक्षतोडीला प्रोत्साहन देणारी व्यवस्था राबवण्याऐवजी वृक्षांचे संरक्षण करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता पर्यावरणप्रेमी नागरिकांकडूनही होत आहे.

Post a Comment
0 Comments